पंढरपुरात ‘छोरीया’ कंपनीच्या फसवणूक प्रकरणी १३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल .
अनेक बडे मासे गळाला लागणार ; अटकेच्या भीतीने अनेक जण नॉट रिचेबल
पंढरपूर :- पंढरपूर जवळच्या वाखरीतील ‘छोरीया प्रॉपर्टीज डेव्हलपमेंट कंपनी’ने खरेदी व विकसीत केलेल्या जमिनीचे संगनमताने, कट रचून बनावट नोटरी साठेखत, कब्जा पावती व कुलमुखत्यार असे दस्त तयार करून त्याआधारे फसवणूक आणि ९ कोटी रूपयांची मागणी केल्याप्रकरणी अखेर सोलापूर व पुणे जिल्ह्यातील १३ भूमाफिया विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध २० कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे पुणे येथील भागीदार कन्हैयालाल जैन यांनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती.
‘छोरीया प्रॉपर्टीचे मालक जैन यांनी वाखरी हद्दीतील २१ हेक्टर जमीन सन २००७ मध्ये अनंता कैकाडी व राजकुमार कैकाडी, भामाबाई जाधव, पद्मीनी कैकाडी आदींच्या संमतीने खरेदी घेतली व बिनशेती करून विकसीत केली आहे. तसेच बांधकामे सुरू करून रेरामध्येही नोंदणी केली आहे. असे असताना सन २०१३ मध्ये अनंता कैकाडी, सागर कैकाडी व राजकुमार कैकाडी यांनी नजीर कोरबू याला सदर मिळकतीबाबत साठेखताचा दस्त करून दिला. राम भाग्यवंत याच्याकडून कुलमुखत्यारपत्राचा दस्त नोटरी करून घेतला. तसेच राजकुमार कैकाडी याने दुर्गाप्पा वाघमोडे व मे.जानकी एंटरप्रायझेस तर्फे सोमनाथ माळी याला साठेखताचा दस्त नोटरी करून दिला.
यातील संशयित आरोपींनी कट रचून, फसवणूक व खंडणीच्या उद्देशाने बनावट नोटरी साठेखत, कब्जा पावती व कुलमुखत्यार असे दस्त तयार केले असून वकिलांच्या मदतीने त्याआधारे न्यायालयात खोटे दावे दाखल केले. खोटे पुरावे निर्माण करून ते खरे असल्याचे भासवले. याप्रकरणी धमकी देत ९ कोटींची मागणी करण्यात आली. तसेच पिस्तुल, कोयता अशा हत्यारांचा धाक दाखवत दरोडा टाकून ६५ हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. कंपनीचे २५ ते ३५ लाखांचे नुकसान केले. यातील संशयित आरोपी सराईत असून संघटित गुन्हेगारी करीत आहेेत, अशा आशयाची खासगी फिर्याद कन्हैय्यालाल जैन यांनी येथील न्यायालयात दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
अनंता बाबू कैकाडी, सागर अनंता कैकाडी, नरसाप्पा आंबादास वाघमोडे, नजीर अब्दुल सत्तार कोरबू, राम विष्णू भाग्यवंत, विजय सोनबा बोरडे, लक्ष्मण दशरथ मंजिले, दुर्गाप्पा नरसू वाघमोडे, सोमनाथ शंकर माळी, मे. जानकी इंटरप्राईजेस अँड डेव्हलपर्स, संतोष राचाय्या स्वामी, आणि अविनाश उर्फ शशिकांत दिगंबर आटकळे यांच्यावर खंडणी, चोरी, दमदाटी, बनावट शासकीच कागदपत्र तयार करणे, कोर्टाची आणि शासनाची फसवणूक करणे असा गुन्हा दाखल झाला आहे.
ताजी बातमी