माघी यात्रे निमित्त पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल.
20 फेब्रुवारी रोजी पंढरपूरात साजरा होतोय माघी यात्रेचा सोहळा.
पंढरपूर :- येत्या 20 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. यात्रा कालावधी 14 ते 26 फेब्रुवारी 2024 असून, यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल 16 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीपर्यंत राहणार आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना सूचना:- पंढरपूरात यात्रे निमित्त अहमदनगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने अहिल्यादेवी चौक, शेटफळ चौक मार्गे मोहोळ रोड विसावा येथे पार्क करावीत. तसेच 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्क करावीत. पुणे,सातारा,वाखरी,मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथील मैदानात पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येवून वेअर हाउस येथे पार्क करावीत. तसेच विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळीमार्गे बायपास मार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर व बिडारी बंगला येथे पार्कींग करावीत.
पंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांबाबत सूचना:- पंढरपूर शहरातून टेंभुर्णी, अहमदनगर, सोलापूर, लातूरकडे जाणाऱ्या सर्व वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका,कॉलेज क्रॉस रोड,कौठाळी बायपास, नवीन सोलापूर नाका मार्गे जातील. पुणे-साताऱ्याकडे जाणारी वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड वाखरी मार्गे जातील तर विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, गादेगाव फाटा पासून मार्गेस्थ होतील.
पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत:- 16 ते 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रदक्षिणा मार्ग, महाव्दार चौक ते शिवाजी चौक,सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गावरुन तीन रस्तामार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात थांबतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एस.टी. बसेसना जुना दगडी पुल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक, लहुजी वस्ताद चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, शिवाजी चौक ते अर्बन बँक, संकुल कॉर्नर ते नगरपालिका हा मार्ग पासेसच्या वाहना व्यतिरिक्त इतर वाहनासांठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पार्किंग व्यवस्था सूचना :- अहमदनगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी सर्व प्रकारची वाहने आहिल्या चौक तीन रस्ता मार्गे विसावा व 65 एकर येथील नगरपालिकेच्या वाहनतळावर पार्किग करतील. पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथे पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी मार्गे येवून टाकळी वेअर हाउस येथे पार्क करावीत. विजापूर, मंगळवेढाकडून येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊस येथे पार्कींग करावीत. शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई असेल.
एकेरी मार्ग:- कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सावरकर चौक ते नवीन कराड नाका यामार्गावर एकेरी वाहतुक राहील. संबधित भाविकांनी व वाहनधारकांनी या बदलेल्या वाहतूक मार्गाची नोंद घेऊन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन श्री. सरदेशपांडे यांनी केले आहे.
00