महादेव कोळी समाजाच्या दाखल्यासाठी वंचित काढणार मोर्चा
16 फेब्रुवारी रोजी पंढरपूर तहसीलदार कार्यालयावर निघणार मोर्चा
पंढरपूर – मागील पन्नास वर्षांपासून महादेव कोळी समाजावर अन्याय होत असून अनेकदा प्रयत्न करूनही जातीचे दाखले दिले जात नाहीत. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी रोजी हलगीनाद मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिली.
याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, युवा अध्यक्ष पांडुरंग खांडेकर, सुरेश शिंदे, सोमनाथ अभंगराव, तालुकाध्यक्ष संतोष कांबळे, सुनील देधाडे, बिरप्पा मोटे, प्रशांत कोलेवार, अण्णा वाळके , संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गायकवाड यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोळी समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण दिले आहे. मात्र महाराष्ट्रातील काही भागात जाणीवपूर्वक हे आरक्षण दिले जात नाही. यामुळे येथील कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. आता कोळी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणार असून यासाठी शुक्रवार दिनांक 16 रोजी पंढरपूर तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोळी बांधवांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले.