सांगोला ( दीपक ऐवळे ) :- अज्ञात कारणावरून वृद्ध पती पत्नीचा निर्दयीपणे हत्या केल्याची घटना सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक गावात घडलीय. पतीच्या मानेत लोखंडी खुट्टी ठोकून वायरने बांधून गच्चीवर झोपवले व पत्नीला जिवे ठार मारून तिचा मृतदेह जिन्याच्या खुंटीला अडकवला होता.
भीमराव गणपती कुंभार (वय ६५) व सुसाबाई भीमराव कुंभार (वय ५०) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. दरम्यान मृताच्या मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पाचेगाव बुद्रुक (ता.सांगोला) येथे उघडकीस आल्याने ग्रामस्थ हादरून गेले आहेत.
डॉ.संजय बाबर हे त्यांच्या घराच्या गच्चीवर गेले असता त्यांना शेजारी राहणारे भीमराव कुंभार हे त्यांच्या गच्चीवर मृतावस्थेत पडल्याचे पाहिले म्हणून त्यांनी गच्चीवरून खाली उतरून त्यांच्या खिडकीतून डोकावले असता सुसाबाई कुंभार ह्या जिन्यावर खुंटीला अडकवलेल्या अवस्थेत दिसून आल्या.
मृताच्या दोन मुलांपैकी एक मुलगा सोने-चांदीच्या दुकानात कामासाठी बंगळुरूला असून, दुसरा मुलगा समाधान हा गावातच वडिलांच्या घरापासून थोड्या अंतरावर त्यांच्यापासून विभक्त राहत होता.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे,सहायक पोलिस निरीक्षक सोनकांबळे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून पाचेगाव बुद्रुक येथे म्हसोबाची यात्रा सुरू आहे.
रात्री उशिरा कुंभार पती-पत्नीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. मात्र रात्री उशिरापर्यंत घटनेबाबत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.