विमा कंपनीची आर्थिक फसवणूक करण्यासाठी रचला कट ; पैशाच्या लालसे पोटी एकाचा गेला बळी.
महूदच्या शक्तिशाली स्फ़ोटाची उकल करण्यात पोलिसांना यश.
पंढरपूर :- (दीपक ऐवळे)सांगोला तालुक्यातील महूद येथे एका टायर गोदामात झालेल्या शक्तिशाली स्फोटाची उकल करण्यात अखेर सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. यात विम्याचा खोटा दावा करून मोठी रक्कम उकळण्याच्या हेतूने स्फोट घडविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कट कारस्थानाचा मुख्य सूत्रधार गोदामाचा मूळ मालक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली होती. मुख्य सूत्रधार नितीन नरळे घटना घडल्यापासून फरार आहे.
१ मार्च रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास महूद येथे टायरच्या गोदामात स्फोट होऊन त्यात अतुल आत्माराम बाड ( वय २७, रा. विठलापूर, ता. आटपाडी, जि. सांगली) याचा जागीच मृत्यू झाला होता. तर दीपक विठ्ठल कुटे (वय २७, रा. शिवापुरी, ता. आटपाडी) हा गंभीर जखमी झाला होता.
मृत अतुल याचा चुलत भाऊ आणि जखमी दीपक कुटे याचा मेव्हणा असलेला रामेश्वर दत्तात्रय बाड (वय ३४, रा. विठलापूर, ता. आटपाडी) याने महूद येथे नितीन पांडुरंग नरळे याच्या मालकीच्या जागेवर उभारलेल्या दोन गोदामांपैकी एक गोदाम भाड्याने घेतले होते. या गोदामात एमआरएफ कंपनीच्या टायरची दुरुस्ती आणि विक्री केली जात होती. तर मूळ मालक नितीन नरळे याच्याही मालकीच्या गोदामात टायर होते. नरळे याने आपल्या गोदामासाठी ८० लाख तर आत्माराम बाड याने भाड्याने घेतलेल्या गोदामासाठी एक कोटी ६५ लाख रुपयांचा विमा उतरविला होता. या दोन्ही विम्यांचे दावे करून त्याप्रमाणे संबंधित विमा कंपनीची आर्थिक फसवणूक करण्याच्या हेतूने नितीन नरळे आणि आत्माराम बाड यांनी एकत्र येऊन आपल्या गोदामात स्फोट घडवून मालाचे नुकसान दर्शविण्यासाठी कट रचला होता. त्यासाठी आत्माराम बाड याने आपला चुलत भाऊ अतुल बाड आणि मेव्हणा दीपक कुटे यांनाही विम्याची रक्कम मिळाल्यास त्यात हिस्सा देण्याचे आमीष दाखवून कटात सहभागी करून घेतले होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी केलेल्या तपासा मध्ये या स्फोटाची उकल झाली असून यात मुख्य कटाचा सूत्रधार नितीन नरळे हा स्फोट घडल्यापासून गायब झाला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एस. रणदाळे, सहायक पोलीस निरीक्षक पवन मोरे व आर. जी. राजूलवार हे पुढील तपास करीत आहेत.