माढ्यात मोहिते पाटलांचं बळ वाढलं….
पंढरपूर तालुक्यातील "या" राजकीय गटाने दिला मोहिते पाटलांना पाठिंबा
पंढरपूर :- माढा लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते प्रचार संपेपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. भाजपने उमेदवारी नाकारल्याने धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून तुतारी हातात घेतली. त्यानंतर भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक अत्यंत चुरशीची बनली. प्रचार यंत्रणा संपेपर्यंत शरद पवार यांच्या सोबत असणारे अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखान्यासाठी पवारांची साथ सोडली. पाच मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपच्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर मोहिते पाटलांनी मोठी राजकीय खेळी केली. पंढरपूर तालुक्यातील मोठा राजकीय गट असलेल्या भालके गटाने मोहिते पाटलांना थेट पाठिंबा दिल्याने मोहिते पाटलांचं बळ वाढलं आहे.
आज पंढरपूर येथे भालके गटाचे नेते भगीरथ भालके आणि अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत भगीरथ भालके यांनी माढ्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. भगीरथ भालके यांनी यापूर्वीच काँग्रेसच्या सोलापूरच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला होता. आता त्यांनी मोहिते पाटलांना समर्थन दिल्याने पंढरपूर तालुक्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील 57 गावातून मोहिते पाटलांना मोठं पाठबळ मिळालं आहे. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातील भालके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.