मनोज जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या महाराजांची गाडी पंढरपूरात जाळली…
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल....
आषाढी एकादशी घडला प्रकार, मराठा आंदोलन आक्रमक
पंढरपूर : मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी लढणारे जरांगे पाटील यांच्यावर जरांगे खोटारडा माणूस आहे, रोज पलटी मारतो, त्याच्या अनेक गुप्त बैठका होतात, असे गंभीर आरोप पत्रकार परिषदांमधून करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूर मध्ये ऐन आषाढी एकादशी दिवशी जळाली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक व मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आली असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे.
बारस्कर यांनी त्यांची दहा लाख रुपये किमतीची एम एच बारा बीपी २००१ या क्रमांकाची कार मंगळवारी चंद्रभागा नदी पलीकडील ६५ एकर येथील पार्किंगमध्ये पार्क केली होती. ही कार आषाढी एकादशी (बुधवार) दिवशी दुपारी दोनच्या सुमारास जळाली आहे. ही कार जाळून त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार अजय साहेब बारस्कर ( वय ४४, भंडार डोंगर, सुदवडी देहू, ता. मावळ, जिल्हा पुणे) यांनी दिली आहे. कारला आग कशामुळे लागली. कोणी लावली याच्या मागे कोणी आहे का नाही याचा तपास पोलीस करत आहेत.
याबाबत अजय महाराज बारसकर यांना विचारले असता त्यांनी कार जाळण्यामागे जरांगे पाटील यांचे समर्थक असल्याचा दावा केला आहे. यामुळे आजही मराठा समाज आक्रमक असल्याचे दिसून आले आहे.
मी जरांगे पाटील यांच्यावर काही आरोप केले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मला सतत धमक्या येत असतात. माझी कार जरांगे पाटलांच्या समर्थकांनी जाळली असल्याची मला खात्री आहे. याबाबत मी पोलिसांना हे सांगितले आहे.
– अजय महाराज बारसकर