आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी घेतली शरद पवारांची भेट
पंढरपूर :- लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि सोलापूर जिल्हा शिवसेना शिंदे गट संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांचे पुतणे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांनी राष्ट्रवादी काँगेस एस पी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
अनिल दादा सावंत हे पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी शरद पवारांच्या पुण्यातील मोती बागेत भेट घेतली.
या भेटी दरम्यान अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून लढण्याची इच्छा शरद पवारांसमोर बोलून दाखवली. उमेदवारीबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री तथा महाविकास आघाडीचे सरकार उलथून टाकण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी थेट शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने हा शिवसेना शिंदे गटाला आणि सावंत कुटुंबाला मोठा धक्का मानला जातोय.
अनिल सावंत भैरवनाथ शुगरच्या लवंगी येथील साखर कारखान्याच्या माध्यमातून पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात कार्यरत आहेत. पंढरपूर शहरामध्ये वास्तव्यास असणारे अनिल सावंत पंढरपूर शहर आणि तालुक्यांमध्ये देखील विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेशी संपर्कात आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी घेण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र अद्याप पर्यंत कुणीही थेट शरद पवारांना याविषयी बोलले नव्हते. मात्र अनिल सावंत यांनी शरद पवारांची थेट भेट घेऊन पक्षातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.