धनगर आरक्षण आंदोलनावर तोडगा नाहीच. आंदोलकांनी सरकारला दिला आठ दिवसाचा अल्टिमेटम.
विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार
यांनी घेतली सकल धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची भेट.
पंढरपूर:- (लखन सर्वगोड) धनगर समाजाची एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी गेली आठ दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक, पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र आंदोलकांनी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली. आंदोलकांनी सरकारला आता आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे.
यावेळी त्यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके उपस्थित होते.
सह्याद्री अतिथी गृहावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सकल धनगर समाजाच्या प्रतिनिंधी सोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेले मा. मुख्यमंत्री यांची स्वाक्षरी असलेल्या निर्णयाची प्रत विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी उपोषणस्थळी सविस्तर वाचून दाखवली. सदर प्रत उपोषणकर्त्यांना देण्यात आली. समाजासाठी आपण सुदृढ आणि व्यवस्थित राहणं गरजेचं असून, उपोषणकर्ते यांना उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी यावेळी केली
त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही बैठकीत झालेल्या निर्णयाबाबतची माहिती यावेळी दिली.