विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपुरात नव्या समीकरणांची नांदी !
परिचारक समर्थक आणि अभिजीत पाटील समर्थकांनी एकत्रित घेतली शरद पवारांची भेट
पंढरपूर :- सध्या पंढरपूर तालुक्यातील प्रमुख नेत्यांना विधानसभेचे वेध लागले आहे. पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. तर दुसरीकडे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. मात्र त्यांनी अद्याप त्यांचा पक्ष सांगितलेला नाही. पंढरपुरातून परिचारक तर माढ्यातून अभिजीत पाटील हे इच्छुक आहेत. मात्र अजून त्यांचा पक्ष ठरलेला नाही. अशा परिस्थितीत रविवारी बार्शी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची परिचारक समर्थक आणि अभिजीत पाटील समर्थक पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे भेट घेतली. त्यामुळे ही पंढरपूरच्या राजकारणातील नवीन नांदी आहे का? अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.
पंढरपूर तालुक्यात परिचारक गट आणि अभिजीत पाटील गट हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र सध्या हे दोघेही भाजप समर्थक आहेत. तसेच परिचारक पंढरपूर मधून तर अभिजीत पाटील हे माढ्यामधून इच्छुक असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मात्र भाजपकडून यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर आहे. प्रशांत परिचारक यांचे चुलते स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक हे 25 वर्ष पंढरपूरचे आमदार होते. शरद पवारांचे ते निकटवर्तीय समजले जात होते. तर अभिजीत पाटील यांनी देखील त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात राष्ट्रवादी प्रवेशाने केली होती. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने प्रशांत परिचारक आणि अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहेत. अशा परिस्थितीत पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, आरपीआयचे नेते सुनील सर्वगोड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि अभिजीत पाटील यांचे कट्टर समर्थक सुभाष दादा भोसले, संदीप मांडवे, माजी नगरसेवक मनोज सुरवसे, माजी नगरसेवक संजय अभ्यंकर , पंढरपूर अर्बन बँकेचे माझे चेअरमन रा. पा कटेकर यांनी एकत्रित जाऊन बार्शी येथे शरद पवारांची भेट घेतली.
या भेटीचा तपशील समोर अद्याप आला नाही. मात्र पंढरपूरच्या राजकारणात नवीन समीकरण उद्या येऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.
माजी आमदार प्रशांत परिचारक पंढरपूर मधून आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी माढ्यातून अपक्ष रिंगणात उतरले तर परिचारकांना पाटील समर्थकांनी पंढरपूर मंगळवेढ्यातून तर अभिजीत पाटील यांना परिचारक समर्थकांनी माढा मतदारसंघात मदत करायची असे नवे समीकरण जुळू शकते. विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे आणि भगीरथ भालके यांच्या विरोधात परिचारक आणि पाटलांकडून साट-लोट्याचं राजकारण केले जावू शकते. अशी चर्चा पंढरपूर आणि माढ्यात सुरू झाली आहे.