सोलापूरात अनुसूचित जातीचे राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा भाजपाचा डाव!
जातीय आरक्षणचं संपवण्याचा कट - समाजाच्या संतप्त प्रतिक्रिया.
पंढरपूर :- कोणत्याही समाजाचे आरक्षण असो वा संविधान, लोकशाही वाचवण्यासाठीचा संघर्ष असो. कायम रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या अनुसूचित जातीचे राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा डाव संध्या सोलापूर लोकसभा मतदार संघात घातला जात असल्याचा आरोप समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 2014 पासून भाजपाचे एकहाती वर्चस्व या मतदार संघावर आहे. मात्र 2019 मध्ये खासदार झालेल्या स्वामींचा जातीचा दाखला बोगस असल्याच्या तक्रारी नंतर खऱ्या अनुसूचित जातींच्या अस्तित्वाचा संघर्ष सुरु झाला.त्याचं वेळी माळशिरस राखीव विधानसभा मतदार संघातून लढलेले उत्तम जानकर यांच्या जातीच्या दाखल्याचा वाद देखील न्यायालयात गेला.
स्वामींच्या दाखल्याचा निकाल लागल्यानंतर देखील त्यांनी पुन्हा भाजपा कडे उमेदवारीची मागणी केली. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उत्तम जानकर यांनी देखील सोलापूरातून लढण्याची तयारी केली. उत्तम जानकर यांच्या जातीच्या दाखल्यावर देखील आक्षेप घेतला आहे. अशातच ते ज्या खाटीक समाजाचे प्रतिनिधी असल्याचे सांगत आहेत. त्या खाटीक समाजाने देखील त्यांच्या विरोधात भूमिका घेतलीय. मात्र भाजपने धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांना उमेदवारी दलितांच्या जागेवर उमेदवारी देण्याची तयारी सुरु केली असल्याची चर्चा आहे.
सोलापूर साठी भाजपा कडून इच्छुक असलेल्या प्रत्येक उमेदवाराने ओरिजिनल जातीचा दाखला असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी केलीय. याला अपवाद फक्त उत्तम जानकर आहेत. त्यामुळे कायम उपेक्षित, दबलेल्या, पिचलेल्या समाजाला प्रतिनिधित्व करण्यासाठी आरक्षण दिले गेले. मात्र आता जातीच्या दाखल्या बाबत तक्रारी असलेला नवा वर्ग तयार करून ओरिजिनल समाज घटकांच्या हक्क अधिकारावर अतिक्रमण केले जात आहे. त्यांचे अस्तित्वचं नष्ट केले जात असल्याची संतप्त भावना आता व्यक्त होतं आहे.
याबाबत बहुजन समाज पार्टीचे रवी सर्वगोड म्हणतात, आमचे खच्चीकरण करून जर बोगस प्रतिनिधी पाठवले जात असतील तर हे आरक्षणचं रद्द करून टाका. समाजाचे खरे प्रतिनिधी लोकसभा, विधानसभेत गेले पाहिजेत.
अशीच भूमिका माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी व्यक्त केलीय. अनुसूचित जातीमध्ये 59 घटक आहेत. यापैकी खऱ्या घटकाला प्रतिनिधित्व मिळावे. बोगस दाखलेवाले आमचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत. असे झाल्यास समाजामध्ये उद्रेक वाढेल.
माजी नगरसेवक डी. राज सर्वगोड यांनी देखील खासदार सिद्धेश्वर स्वामी यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळाचा दाखला देत हल्लाबोल केलाय. हे बोगस बियाणे आमच्यावर लादू नका जे ओरिजिनल आहेत त्यांनाच उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केलीय.
सध्या सोलापूरसाठी माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राजेश मुगळे, जयश्री खरात, यांनी मागणी केलीय तर पक्षामध्ये आमदार राम सातपुते यांचे नाव ही चर्चेला घेतले आहे. तर आरपीआय आठवले गटाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासाठी जागा सोडण्याची मागणी केलीय. या उमेदवारांच्या जातीच्या दाखल्याबाबत कुठलीही तक्रार नाही. यांच्याकडे ओरिजिनल दाखले आहेत.