Uncategorized

लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मतदार संघात काँग्रेसला कौल. महाविकास आघाडीकडून विधानसभेला कुणाला मिळणार संधी.

भगीरथ भालके की अभिजीत पाटील?

पंढरपूर:- अत्यंत चुरशीचा झालेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने मोठी मुसंडी मारत विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या विजयी झालेले आहेत. यामध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे. कुठलीही सक्षम यंत्रणा नसताना काँग्रेसच्या पारड्यात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात तब्बल 1 लाख 24 हजार 411 मतदान झाले. प्रणिती शिंदे यांना तब्बल 45 हजार 420 मतधिक्य मिळाले. त्यामुळे आता महाविकास आघाडी कडून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात उमेदवार कोण असणार याची चर्चा आता सुरू झालीय.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने मोठी बाजी मारलीय. मोहोळ आणि पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाला आहे. पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघ हा स्थापनेपासून कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी सलग तीन वेळा येथून विजय मिळवला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे आमदार समाधान दादा आवताडे यांचा साडेतीन हजार मतांनी विजय झाला होता. भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आणि सोलापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे पाच आमदार असल्याने सोलापूर मध्ये भाजपचा उमेदवार सहज निवडून येईल अशी अपेक्षा भाजपाला होती. मात्र भाजपच्या स्वप्नांवर मोहोळ आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाने नांगर फिरवला. पंढरपूर मतदार संघामध्ये 45 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याने महाविकास आघाडी कडून कुणाला संधी मिळणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्यासह यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी प्राचार्य यंत्रणा राबवली. तर काँग्रेसला फक्त भगीरथ भालके यांनी पाठींबा दिला होता. या मतदारसंघात काही बुथवर काँग्रेसला पोलिंग एजंट देखील मिळाले नाहीत. तरीदेखील काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान झाले. मतदारांनी ही निवडणूक हातात घेतल्याचे चित्र यामुळे निकालानंतर स्पष्ट झाले. काँग्रेसला 45 हजार मताधिक्य मिळाल्याने भाजपचे धाकधूक वाढली आहे. भाजपकडून विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे हे उमेदवार असतील. मात्र महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला संधी मिळणार हे चित्र अद्याप स्पष्ट होताना दिसत नाही.

भगीरथ भालके यांना संधी मिळणार?

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील पराभवा नंतर भगीरथ भालके यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील पराभव झाला. यानंतर विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने नाराज झालेल्या भगीरथ भालके यांनी बी आर एस पक्षांमध्ये प्रवेश केला. तेलंगणामध्ये बी आर एस चा पराभव झाल्यानंतर भालके पुन्हा महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचा प्रचार देखील केला. ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र मतदानादिवशी भालके कुठेच दिसले नसल्याची चर्चा सुरू झाली होती.

अभिजीत पाटील महाविकास आघाडी कडून लढण्याचे धाडस करणार का?

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून इच्छुक असलेले अभिजीत पाटील यांना शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये कारखान्यावरील झालेली कारवाई मागे घ्यावी यासाठी अभिजीत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र सोलापूर आणि माढा मतदारसंघांमध्ये भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला आहे. अवघ्या चार महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अभिजीत पाटील पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे धाडस करणार का? अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close