खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून गणेश शिंदेनी केली आत्महत्या. सावकार बहीण भावावर गुन्हा दाखल
सखोल तपास करण्याची कुटुंबाची मागणी
पंढरपूर :- शहरातील गणेश रमेश शिंदे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 2 मार्च रोजी उघडकीस आली होती. खासगी सावकार बालाजी उर्फ आनंद दांडेकर आणि त्याची बहीण ललिता उर्फ राणी गायकवाड यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात भादवी 306, 34 तर महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 नुसार 39 आणि 45 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशचा भाऊ अतुल शिंदे याने फिर्याद दाखल केली आहे.
दाखल फिर्यादी नुसार मयत गणेशचा मृतदेह सापडण्यापूर्वी तो तीन ते चार दिवस बेपत्ता होता. गणेशचा मृतदेह सापडल्या नंतर यातील मुख्य आरोपी बालाजी याने गणेशचा मोबाईल त्याचा भाऊ योगेशला आणून दिला. यावर बालाजीला मोबाईल तुझ्याकडे कसा आला याची विचारणा केली असता बालाजीने उडवा उडवीची उत्तरं दिली. यानंतर गणेशचा मोबाईल तपासला असता त्यामधील अनेक कॉल रेकॉर्ड डिलीट केल्याचे दिसून आले. तर दोन कॉल रेकॉर्ड मध्ये एक महिला तीचा भाऊ बालाजी याला गणेश तुझा मित्र आहे. तू मर्द असशील तर त्याच्यावर हात उचलून दाखव असं सांगत आहे. या रेकॉर्डिंग वरून आरोपी बालाजी आणि त्याच्या बहिणीच्या त्रासाला कंटाळून गणेशने आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश आत्महत्या करण्यापूर्वी मयत गणेश, आरोपी बालाजी आणि त्याची बहीण ललिता यांची सांगोला रोड वरील हॉटेल पंचरत्न येथे बैठक झाली होती अशी माहिती पुढे येतं आहे. यावेळी व्याजाच्या पैशावरून गणेशला मारहाण केल्याचा जबाब प्रत्यक्षदर्शीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.