Uncategorized

मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल व किसान रेल पुन्हा सुरू करण्यासंदर्भात मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी.

प्रतिनिधी :- लखन सर्वगोड

पंढरपूर :- खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल (GCT) उभारण्याची,बंद झालेली किसान रेल्वे पुन्हा चालू करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भेट घेऊन मागणी केली.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ते बिहार राज्यातील दानापूर किसान रेल्वे पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भात आग्रही मागणी केली. कोरोना काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू केली होती. या योजनेला देशभरातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रेल्वेचा वापर करून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, आणि शालिमारसारख्या मोठ्या शहरांमध्ये डाळींब, द्राक्ष, केळी, पेरू, कांदा, लिंबू, आणि इतर भाज्यांचे कमी खर्चात आणि कमी वेळेत वाहतूक केली होती. किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा मालवाहतुकीवरील खर्च 75% कमी झाला होता. रस्ते वाहतुकीसाठी प्रति किलोमीटर 7-8 रुपये खर्च येत असे, तर रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक केल्यास हा खर्च प्रति किलोमीटर केवळ 2.50 रुपये इतका कमी झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे एक फायदेशीर पर्याय बनला होता. या पार्श्वभूमीवर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्र सरकारकडे किसान रेल्वे पुन्हा सुरू करण्याची आणि सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी , केम, आणि जेऊर या स्थानकांवर या रेल्वेचे थांबे देण्याची मागणी केली आहे.

याच बरोबर सोलापूर जिल्ह्यात मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल (GCT) उभारणीमुळे जिल्ह्याचा औद्योगिक विकास होईल, आणि रोजगार निर्मितीतही मोठी वाढ होईल. म्हणून, सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे मार्गावर गती शक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल (GCT) उभारण्याची आपण तातडीने कार्यवाही करावी अशी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मंत्री वैष्णव यांना विनंती केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात वाढ करण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच येथील वस्त्रोद्योग, विविध कृषी उत्पादने, आणि औद्योगिक वस्त्या या ठिकाणांहून उपलब्ध होणाऱ्या मालाच्या वाहतुकीसाठी गती शक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल (GCT) अत्यंत उपयुक्त ठरेल. या टर्मिनल मुळे, बियाणे, सिमेंट, स्टील, टाइल्स, कंटेनर, आणि इतर विविध वस्तूंची वाहतूक करता येईल. एक मालगाडी साधारणपणे 40-50 डब्यांची असते आणि याची हाताळणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. या प्रक्रियेत मजूर, सुरक्षा रक्षक, क्रेन चालक, आणि कामगारांची आवश्यकता भासेल. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील..

या व्यतिरिक्त, सोलापूरमधील वस्त्रोद्योगाला आणि कृषी उत्पादकांना या टर्मिनलमुळे जागतिक बाजारपेठांमध्ये स्पर्धा करण्याची संधी मिळेल. या भागातील उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांची बाजारपेठेत जलद आणि प्रभावी वाहतूक करण्याचा मार्ग सुलभ होईल, ज्यामुळे निर्यातीला चालना मिळेल. तसंच, या धोरणामुळे औद्योगिक वसाहतींच्या जवळपासच्या भागात नवे आर्थिक क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, यासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील प्रयत्नशील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close