अकलूज येथे वडार समाजाचा अकलूज पोलिसांच्या विरोधात निषेध मोर्चा
पंढरपूर प्रतिनिधी:- लखन सर्वगोड
पंढरपूर:- गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान अकलूज येथे वडार समाजातील महिला व पुरुषांवर बेकायदेशीरपणे केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी अकलूज येथे सकल वडार समाज आणि मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये वडार समाजातील हजारो नागरिक सामील झाले होते.
या मोर्चास विविध पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
यावेळी लाठी हल्ल्याची सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी वडार समाजाच्या वतीने करण्यात आली.
याबाबतचे निवेदन अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुढील काळात मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये याची दक्षता घेण्यात आली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.