सांगोल्याचे प्रसिद्ध उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या डॉक्टर सुनेची आत्महत्या. मुलगा डॉ. सुरज रुपनर याच्यावर गुन्हा दाखल.
पंढरपूर :- सांगोल्याचे प्रसिद्ध उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांची सून डॉ. ऋचा सुरज रुपनर हिने 6 जुन रोजी सांगोला येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या विरोधात त्यांचा मुलगा डॉ. सुरज भाऊसाहेब रुपनर याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात डॉक्टर सुरज भाऊसाहेब रुपनर याच्यावर भादवि 306, 498 A, 323, 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगोला पोलीस ठाण्यामध्ये दाखल फिर्यादीनुसार, पंढरपूर येथे वैद्यकीय व्यवसाय करणारा डॉ. सुरज भाऊसाहेब रुपनर याचे विवाहबाह्य अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध होते. हे पत्नी ऋचाला माहिती झाले होते. तरी दोन मुले आणि संसाराचा विचार करून ती सर्व अन्याय अत्याचार सहन करत होती. तसेच डॉ. सुरज याला आपल्या वैद्यकीय व्यवसायासाठी अत्याधुनिक पद्धतीचे एम आर आय मशीन घ्यायचे होते. यासाठी त्यांनी आपली पत्नी डॉ. ऋचा सुरज रुपनर यांच्या नावावर वडिलांची असलेल्या चार गुंठे जमीनीवर कर्ज काढून देण्याचा तगादा लावला होता. कर्जाच्या कागदपत्रांवर सही न केल्याने त्याने ऋचाला वारंवार मारहाण आणि शिवीगाळ केली होती. तसेच बघून घेण्याची धमकी देखील दिली होती. यावेळी ऋचाने मला आत्महत्या करण्याचा विचार येवू लागल्याचे डॉ. सूरजला सांगितले असता त्याने आत्महत्या करण्यापूर्वी कागदपत्रांवर सह्या कर नाहीतर तुझ्या माहेरहून मशीन घेण्यासाठी पैसे आणून दे असा दम दिला. अखेर डॉक्टर सुरज यांच्या त्रासाला कंटाळून डॉ. ऋचा हिने सहा जून रोजी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.